जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमकीत २ दहशतवादी ठार   

किश्तवाड : सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चतरूच्या सिंहपोरा भागात चकमक सुरू होती. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचे तीन ते चार दहशतवाद्यांना या भागात घेरल्याचे सांगण्यात येत होते. आता यापैकी दोन दहशतवाद्यांना ठार केले. निमलष्करी दलांनी संयुक्तपणे केलेल्या शोध मोहिमेनंतर या दहशतवाद्यांना घेरले होते.

दोन आठवड्यात ८ जणांचा खात्मा

लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या ‘ऑपरेशन ट्रॅशी’ बद्दल माहिती दिली आहे. या संयुक्त मोहिमेत गोळीबार सुरू झाल्यानंतर अतिरिक्त सैन्य तैनात केले. दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले आहे.
 
सिंगपोरा चतरू येथे सकाळी ७ वाजता ही चकमक सुरू झाली, ज्यामध्ये दोन पॅरा एसएफ, लष्कराच्या ११ आरआर, ७ वी आसाम रायफल्स आणि एसओजी किश्तवाड यांच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली होती. प्राथमिक माहितीनुसार सुरक्षा दलांनी या भागात तीन ते चार दहशतवादी घेरल्याचे सांगण्यात आले होते, आता त्यापैकी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
 
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई केल्याचे प्रशासनाने सांगितले. या भागात घेरण्यात आलेले दहशतवादी हे त्याच गटाचे सदस्य असल्याचे मानले जात आहे जे काही दिवसांपूर्वी याच भागात झालेल्या चकमकीतून पळून गेले होते. जम्मू आणि काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने या महिन्याच्या सुरुवातीला दोन कारवायांमध्ये खोऱ्यात सहा दहशतवाद्यांना ठार केले होते. ज्यामध्ये तीन जण जैश-ए-मोहम्मदचे सदस्य होते. दरम्यान आता गेल्या काही दिवसात ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या ८ वर पोहचली आहे.
 

Related Articles